नवीन वर्षात पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या?
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात येणार आहेत. नवीन वर्षातील पहिल्या आठवड्यात या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणत्या ठाणेदारांची ठाणी बदलणार आणि कोठे कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता अधिकाऱ्यांना लागून राहिली आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी कार्यभार घेऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील अनेक निरीक्षक, सहायक निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. तर काही अधिकारी नव्याने जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
शिवाय जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण झालेले काहीजण बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात नव्याने आलेले बरेच अधिकारी चांगल्या पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा आहे. त्यासाठी काहींनी फिल्डिंगही लावली आहे. तर जिल्ह्यात काहीच राम राहिला नाही असे म्हणत नव्याने आलेल्या काहींनी परिक्षेत्रातील अन्य जिल्ह्यात बदली होण्यासाठी विनंती अर्ज केल्याचीही चर्चा आहे.
जिल्ह्यातील पोलिस दलाच्या आस्थापना मंडळाची बैठक नुकतीच झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचेही गॅझेट जानेवारीत फुटू शकते असेही बोलले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.