केवळ रेखाचित्रावरून तीन दरोडेखोरांना अटक
धुळे : खरा पंचनामा
एकाच रात्री औरंगाबाद ते धुळेदरम्यान तीन ठिकाणी दरोडे टाकून दहशत माजविणाऱ्या टोळीतील सहापैकी तिघांना केवळ रेखाचित्र आणि त्यांच्या कारच्या क्रमांकावरून पकडण्यात आले.
दरोड्याची घटना धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात रविवारी पहाटे घडली होती. फरार अन्य तिघांचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.
राजेश परशुराम राठोड (वय ३१, रा. मांजरीतांडा, ता. मुखेड, जि. नांदेड), जगदीश शिवाजी पवार (वय १९, रा. कमलेवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड), योगेश शंकर पवार (वय ३४, रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पुण्याच्या वाघोलीतील राकेश कदम त्यांच्या मित्रांसह उज्जैन येथील महाकालेश्वराचे दर्शन घेऊन पुण्याकडे जात असताना रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील बालाजी पेट्रोल पंपाजवळ थांबले. ते कारमध्ये झोपलेले असताना सहा दरोडेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. गाडीच्या काच फोडून राकेश कदम यांना तिघाजणांनी चाकूचा धाक दाखविला. रोकड आणि मोबाइल असा २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन त्यांनी पोबारा केला.
याप्रकरणी राकेश कदम यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हा गंभीर गुन्हा असल्याने तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी समांतर तपास सुरू करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी दिले होते.
घटनेच्या वेळी असलेल्या दरोडेखोराचे रेखाचित्र गाडीतील एकाने काढून पोलिसांना दाखविले आणि लूट केल्यानंतर लाल रंगाच्या कारमधून (एमएच १४ बीक्यू १५७३) दरोडेखोर पसार झाल्याची माहिती पोलिसांना
देण्यात आली. दरोडेखोर शिरपूरच्या दिशेने गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
ही कार मध्य प्रदेश राज्यातील सेंधवाकडे जात असताना हाडाखेडजवळ कार थांबविण्यात आली. पोलिसांना पाहून तिघांनी पळ काढला. तीन दरोडेखोर मात्र एलसीबीच्या तावडीत सापडले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.