हिवाळी अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार!
नागपूर : खरा पंचनामा
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. महत्वाच्या विविध मुद्दय़ांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे, तर त्यांना सडेतोड उत्तर देण्याची सरकारची तयारी असल्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनात विशेषत: राष्ट्रपुरुषांच्या अवमानावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. तसेच लोकायुक्त कायद्याचं बिल देखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात विरोधकांचा सामना करणार आहेत. अर्थात त्यांच्या सोबतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील असणार आहेत. मात्र अजित पवारांसारखा विरोधी पक्ष नेता आणि सोबतीला राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेससारखे तगडे विरोधक समोर असणार आहेत. नागपुरात पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.
राज्य विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान आदी मुद्दय़ांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. हिवाळी अधिवेशनानिमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार यांची काल पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ही आज बैठक होणार आहे, तसेच उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या कामकाजातही सहभागी होण्याची शक्यता आहे. असेही सांगितले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार आहेत. त्यामध्ये धनगर समाजाचा मोर्चा, विदर्भ जन आंदोलन समितीचा मोर्चा तसेच आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान अधिवेशनासाठी नागपूर शहर देखील सज्ज झालं आहे. अधिवेशनामुळं शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विधानभवनाचे कामकाज सुरू असताना सात मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून चार मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 18 ठिकाणी वाहतूक संथ होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.