सांगली सिव्हिलचा कारभार रामभरोसे!
अधिष्ठाता यांच्या बदलीसह कोविड काळातील खर्चाच्या चौकशीची मागणी
सांगली : खरा पंचनामा
मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर नणंदकर यांच्या कारभारावर कर्मचारी, सर्वसामान्य रुग्ण ही नाराज आहेत. तर त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सांगली सिव्हिलचा कारभार रामभरोसे आहे. शिवाय कोविड काळात केलेल्या खर्चासह दिलेल्या विविध टेंडरची चौकशी करावी. अधिष्ठाता डॉ नणंदकर यांची तातडीने बदली करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटना, रुग्ण सेवा संघटनेने केली आहे.
आरोग्य पंढरी म्हणून मिरजेसह सांगलीची ओळख आहे. मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अनेक वर्षांपासून सुरू आहे. या महाविद्यालयाशी मिरज आणि सांगली येथे संलग्न रुग्णालय आहेत.
सांगली शासकीय रुग्णालयात सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत अधिष्ठातांची उपस्थिती अपेक्षित आहे. आठवड्यातून एकेदिवशी सर्व विभाग प्रमुखांची बैठक सक्तीची आहे. दुपारी बारा नंतर मिरज शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची उपस्थिती अपेक्षित असते. या पुर्वीच्या सर्वच अधिष्ठाता याची अंमलबजावणी कसोशीने करत होते. मात्र डॉ. सुधीर नणंदकर यांची नेमणूक झाल्यापासून या नियमाला हरताळ फासण्याचे काम झाले आहे.
डॉ. नणंदकर यांच्या मदतीसाठी त्यांचे सह्यायक धडपडत आहेत. मात्र सांगलीत त्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉक्टरांची बदली सिंधुदुर्ग येथे अधिष्ठाता म्हणून झाली आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवस सांगली शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाताचा कारभार ठप्प झाला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या बाबतीत अधिष्ठाता कार्यालयाकडून निविदा मागवल्या जातात. यावर्षीही निविदा मागवल्या गेल्या. मात्र या निविदा उघडण्याचं काम गेले तीन महिने झालेले नाही. त्यामुळे या सर्व सेवेवर विपरीत परिणाम होत आहे.
कोविड काळात अधिष्ठाता यांच्या बगलबच्यानी अनेक निविदा बेकायदेशीररित्या मंजूर केल्या. त्यातून कमाई केली. आता कोविड संपल्यावर हे बगलबच्चे शासनाचा पगार घेणाऱ्या आपल्याच लोकांना बाहेर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेले व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे अधिष्ठाता ननंदकर यांच्यासह त्यांच्या जीवावर अवैधरित्या व्यवसाय करण्यास भाग पडणारे बगलबच्चे आणि सिव्हिलमधील संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या संघटनाकडून करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.