हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तावरील पोलिस राहिले उपाशी !
नागपूर : खरा पंचनामा
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या टेकडी मार्ग आणि मॉरिस कॉलेज टी पॉईंटवरील जवळपास १०० हून अधिक पोलिसांवर उपाशी राहण्याची वेळ आली. कंत्राटदाराने पाठविलेले भोजन संपल्यामुळे या पोलिसांना भोजन मिळाले नाही.
तर ज्यांना भोजन मिळाले त्या पोलिसांनी हे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार केली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी विविध जिल्ह्यांतून पोलिसांना नागपुरात तैनात करण्यात आले आहेत. यात टेकडी मार्ग आणि मॉरेस कॉलेज टी पॉईंट येथे विधानभवनावर काढण्यात येणारे मोर्चे अडविण्यात येत आहेत. या दोन्ही ठिकाणी जवळपास ३०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी या पोलिसांसाठी भोजन आले. मात्र १००च्या वर पोलिसांचे भोजन राहिले असताना भोजन संपले. भोजन संपल्यामुळे पोलिसांचा नाईलाज झाला. त्यांना दुपारी चार वाजेपर्यंत दुसरे भोजन येणार असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना भोजन पुरविण्यासाठी एका कंत्राटदाराला पोलिस मुख्यालयातून कंत्राट देण्यात आले आहे. ८५ रुपये प्रति थाळी या दराने तो पोलिसांना भोजन पुरवत आहे. परंतु, पुरविण्यात येणारे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी आपले घरदार, शहर सोडून आलेल्या पोलिसांवर संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे उपाशी राहण्याची वेळ आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.