रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढणार!
पुणे : खरा पंचनामा
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीच्या वेळी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी चौकशी वेळी रश्मी शुक्ला यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावल्याचं म्हटलं आहे. मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान फोन टॅपिंग करण्यात आले होते.
2021 मध्ये हा मुद्दा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्ला यांनी आपला फोन टॅप केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या फोन टॅपिंग प्रकरणात भाजपचे काही बडे नेते, राष्ट्रवादीचे काही नेते आणि काँग्रेसचे नाना पटोले यांची नावे आहेत.
फोन टॅप केल्याचा आरोप असलेल्यांमध्ये नाना पटोले, रावसाहेब दानवे यांचे पीए, भाजप खासदार संजय काकडे, आमदार बच्चू कडू, आशिष देशमुख यांचा समावेश आहे. याशिवाय काही सरकारी अधिकारी आणि काही पत्रकारांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता.
पुणे पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. त्यावेळी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे हे चौकशी समितीचे प्रमुख होते.
समितीच्या तपासानंतर पुण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी 25 फेब्रुवारी 2022 रोजी पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
परंतु जुलै 2022 मध्ये राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना याप्रकरणी क्लीन चीट देत पुणे न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. पण कोर्टाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला आहे त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.