जतमध्ये सराईत दुचाकी चोरट्यास अटक
सांगली : खरा पंचनामा
जत्रा- यात्रांमध्ये दुचाकीसह महागड्या मोबाईलची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तब्बल बारा दूचाकी आणि चार मोबाईल असे एकूण सात लाख ४१ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
मोदीनसाब सरदारसाब वालीकर (वय २१, रा. हैनाळ, ता. इंडी, जि. विजापूर) असे या चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील एक पथक जत परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी पथकातील पोलिस अंमलदार आमसिध्दा खोत आणि वैभव पाटील यांना सराईत चोरटा मोदीनसाब वालीकर याच्या हालचालीबाबत माहिती मिळाली. संशयीत वालीकर हा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी जत तालुक्यातील गुड्डापूर-व्हसपेठ या रस्त्यावरील एका चौकात येणार होता.
काल पोलिसांनी त्या रस्त्यावरील चौकात सापळा लावला. त्यावेळी संशयीत वालीकर हा एक विना क्रमांकाची दूचाकी घेऊन तेथे आला. तो इकडे-तिकडे पहात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीच्या कागदपत्रांबाबत चौकशी करताना त्याला नीट उत्तरे देता आली नाहीत. पथकाने सखोल चौकशी केली.
या चौकशीदरम्यान वालीकर याने दुचाकी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने कर्नाटकातीलच अथणी, जत तालुक्यातील कोकटनूर या ठिकाणावरुन चार मोबाईल चोरल्याचे उघडकीस आले आहे. जत पोलिस अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.