दादा महापालिकेची निवडणूक हाय काय?
सांगली : खरा पंचनामा
अलीकडे निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. आज सांगली जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतिसाठी मतदान होत आहे. पण आता सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे मैदान जवळ आहे. तीनही शहरात रस्ते, गटारी, पथदिवे यांसह अनेक कामे गतीने सुरू आहेत. मिरजेत तर वर्षानुवर्षे असलेला रस्त्यांचा मोठा प्रश्न मार्गी लावण्याचे नाटक सुरू आहे. अनेक कामे सुरू झाल्याने महापालिका क्षेत्रातील नागरिक दादा महापालिकेची निवडणूक जवळ आल्या काय असा प्रश्न विचारत आहेत.
सध्या महापालिकेत महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांना काँग्रेसची साथ आहे. स्थायी समिती मात्र भाजपकडे आहे. अशी तिरपांगडी सत्ता असून नगरसेवक मात्र खुश आहेत. पुढची सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खूपच प्रयत्नशील आहे. भाजप पण अलीकडे आक्रमक झाली आहे. त्यामानाने काँग्रेसच्या गोटात अजूनही गटातटाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अजूनही निवडणुकीची तयारी सुरू नसल्याचे चित्र आहे.
महापालिका क्षेत्रात ठाकरे गट, शिंदे गट आणि मनसेची ताकद नगण्य आहे. काही स्थानिक गट आहेत त्यांचीही ताकद फारच मर्यादित आहे. त्यामुळे हे स्थानिक गट ऐनवेळी एखाद्या पक्षाशी हातमिळवणी करून आपला भाग सांभाळतात. यावेळी सगळ्याच गटातील विद्यमान, माजी तसेच इच्छुक नगरसेवकांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात कुठेही गेले तरी रस्ता, गटारीसह अनेक कामे सुरू असल्याचे चित्र आहे. महापालिकेची पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे. त्यामुळे गेली चार वर्षे कोमात (कमाईत) असलेले नगरसेवक, इच्छुक जोमाने कामाला लागले आहेत.
विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक आतापासून लोकांचे उंबरे झिजवू लागले आहेत. सातत्याने काम करणारे ठराविक नगरसेवक सोडले तर इतरांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यातील इच्छुक कोणाच्या पारड्यात वजन टाकतात त्यावरही अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. एकंदरीत तीनही शहरात सुरू असलेली कामे पाहून नागरिकांना मात्र निवडणूक जवळ आल्याची जाणीव झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.