Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दारू तस्करीच्या वादातून दोघांचा खून

दारू तस्करीच्या वादातून दोघांचा खून 



नागपूर :  खरा पंचनामा

दारू तस्करीच्या टोळीयुद्धातून दोघांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. नागपूर-अमरावती मार्गावरील वडधामना येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. महेश उर्फ सलमान गजभिये (१९) आणि योगेश मेश्राम (३०, दोघे रा. भिवसनखोरी) अशी मृतांची नावे आहेत. 

सलमान आणि योगेश दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. सलमानविरुद्ध खुनाचा गुन्हाही दाखल होता. योगेशलाही हद्दपार करण्यात आले होते. दोघांचाही भिवसनखोरीत अवैध दारूचा अड्डा होता. पोलिसांनी कारवाई केल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी भिवसनखोरीचा दारू अड्डा कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीत हलविला होता. 

दारूमाफिया भिवसनखोरीऐवजी गोंडखैरी परिसरात दारूभट्ट्या चालवित आहेत. येथून दारू घेऊन भिवसनखोरीत भेसळ करून विकण्यात येत होती. या हत्याकांडातील आरोपीसुद्धा अवैध दारूच्या धंद्यात आधीपासूनच सक्रिय आहेत. दारू तस्करीवरून सलमान आणि योगेशचा प्रतिस्पर्धी कुख्यात आरोपी अब्बाससोबत आधीपासूनच वाद सुरू होता. अब्बासने सलमानच्या चेहऱ्यावर वस्तऱ्याने हल्लाही केला होता. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांचा काटा काढण्याची धमकी देत होते. 

सलमान आणि योगेश सोमवारी पहाटे बाइकवरून दारू आणण्यासाठी गोंडखैरीला गेले होते. त्याची अब्बासला भणक लागली. तो आपले साथीदार रितिक नाईक, बोंडा आणि दीपक बिसेन सोबत कारने (एमएच ०१ एआर ३५४९) त्यांचा पाठलाग करू लागला. 

अमरावती मार्गावर वडधामनाजवळ सकाळी ७ च्या सुमारास कारमध्ये बसलेल्या आरोपींनी सलमान आणि योगेशच्या बाइकला धडक दिली. यात दोघेही खाली पडले. त्यानंतर आरोपींनी दोघांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.