महाराष्ट्रात सध्या तरी कोरोनाचे निर्बंध नाहीत!
मुंबई : खरा पंचनामा
कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकानंतर दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याचे व सोशल डिस्टनस ठेवण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाही, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
राज्यातील करोना परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोरोना विषाणूचा बीएफ ७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आदी या बैठकीला उपस्थित होते. जगातील करोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोरोना परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या २२१६ करोना रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चाचण्या, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि करोना अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.