सांगलीत भरदिवसा 37 तोळ्यांचे दागिने लंपास; शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
सांगली : खरा पंचनामा
शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांवर चोरट्यांनी लक्ष केले आहे. वर्दळीच्या ठिकाणी तसेच दिवसाढवळ्या चोरीचे धाडस चोरटे करत आहे. शहरातील टिळक चौकातील अशाच एका वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी बंद घर फोडले. कापड व्यापाऱ्याच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी ३७ तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. शहर पोलिस ठाण्यानजीक झालेल्या घटनेमुळे शहर घबराहट पसरली आहे. सांगली शहरात वारंवार दरोडा, जबरी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सोमवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाचच्या सुमारास ही चोरी झाली. याप्रकरणी सर्वेश बियाणी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 37 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्याद म्हटले आहे.
बियाणी कुटुंबिय हे शहरातील प्रसिद्ध कापड व्यावसायिक आहेत. बियाणी हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील टिळक चौक येथील पेठभाग परिसरात असणाऱ्या बियाणी बिल्डिंगमध्ये राहतात. काल दुपारी दोनच्या सुमारास ते आपल्या कुटुंबियांसह इचलकरंजी येथे कामानिमित्त गेले होते. यावेळी अज्ञात चोरटयांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील असणाऱ्या लोखंडी कपाट फोडून कपाटात ठेवलेले दागिने लंपास केले. त्यात १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस, ९० ग्रॅम वजनाचे कानातील तीन टॉप्सचे सेट, २० ग्रॅम वजनाची दोन पेंडल असलेली सोन्याची चेन, ३५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा कपाळावरील बोर, ६० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या, ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या अंगठ्या, १० ग्रॅम वजनाच्या दोन वेढन अंगठ्या, २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, दोन सोन्याची नाणी, दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा डळा, १ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा डायमंड नेकलेस व टॉप्स सेट ४५ ग्रॅम वजनाचा, दहा हजार रुपये किमतीची चांदीचे दागिन्यांसह दहा हजारांची रोकड लंपास केली.
दरम्यान, बियाणी हे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरी परतले तेंव्हा त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे परिसरात घबराहट पसरली आहे. घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.