Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सत्यजीतला कोरा एबी फॉर्म दिला होता!

सत्यजीतला कोरा एबी फॉर्म दिला होता!



कोल्हापूर : खरा पंचनामा

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काँग्रेसचा एबी फॉर्म माझ्या नावाचा मिळाला नाही अशी भूमिका मांडली आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना एक एबी फॉर्म आणि दूसरा कोरा एबी फॉर्म हा सत्यजित तांबे यांना दिला होता अशी चर्चा असतांनाही सत्यजित तांबे यांनी माझ्या नावाचा एबी फॉर्म आला नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. दरम्यान आमदार विश्वजित कदम यांनी सत्यजीत याला कोरा एबी फॉर्म दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. कोल्हापूर येथे कदम यांनी हा गौप्यस्फोट केला.

सत्यजित तांबे यांना कोरा एबी फॉर्म दिल्याचा दावा कदम यांनी केला आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांची चांगलीच अडचण होणार असल्याची चर्चा आहे. सत्यजित तांबे यांना पक्षाने डावलले नाही असंही स्पष्टीकरण कदम यांनी दिले आहे.

कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबियांनी घ्यायचा होता, कोरा एबी फॉर्म तांबे यांना दिला होता, मग तांबे यांना डावलल असं कसं म्हणता असा सवालही कदम यांनी केला आहे.

वरिष्ठांनी तांबेंच्या बाबतीचा निर्णय घेतला आहे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आम्ही पाहतोय, विरोधी नेता आला तर नमस्कार करायचा नाही का? आम्ही असे संस्कार पाहिले आहेत असं म्हणत कदम यांनी भाजपाला टोला लगावला. आहे.

सत्यजित तांबे यांना कपिल पाटील यांच्या संघटनेने पाठिंबा दिला आहे. पण सत्यजित तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच कायम आहे. सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपने उमेदवार न देता सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शविला आहे अशी चर्चा सुरू असतांना तांबे यांनीही यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

एकूणच विश्वजित कदम यांनी केलेला दावा पाहता सत्यजित तांबे यांची अडचण अधिक होणार असल्याचे बोललं जात असून तांबे यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडणुकीत कदम आणि तांबे यांच्यात थेट लढत झाली होती. त्यावेळपासून दोघांमध्ये राजकीय विरोध असल्याची चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.