घोगावमधील खूनाचा चार तासात उलगडा, एकाला अटक; सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यातील घोगाव येथील रेल्वे फाटकाजवळ सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास संतोष उमेश गाडवे (वय ४३, रा. कवठेपिरान) याचा मृतदेह सापडला होता. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर गाडवे याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सांगली एलसीबीच्या पथकाने तपासाची चक्रे गतीमान करत चार तासात या खूनप्रकरणी एकाला अटक केली. त्याच्याविरोधात कुंडल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.
श्रीहरी रविंद्र वडगावे (वय २३, रा. कवठेपिरान) याला या खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे. घोगाव येथील कराड-तासगाव रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळील एका एसटी पिकअप शेडजवळ गाडवे याचा मृतदेह मंगळवारी रात्री आढळून आला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी तातडीने या घटनेचा तपास करण्याचे आदेश एलसीबीला दिले होते. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे एक पथक तयार केले.
पथकाने मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तपास सुरू केला. त्यानंतर संतोष गाडवे आणि श्रीहरी वडगावे सकाळपासून गावातून निघून गेल्याची माहिती पथकाला मिळाली. नंतर पथकाने वडगावे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आथिर्क देवाणघेवाणीतून वाद झाल्याने संतोषचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून कुंडल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
निरीक्षक शिंदे यांच्या मागर्दशर्नाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशाणदार, चेतन महाजन, मेघराज रूपनर, प्रशांत माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.