तांबे पिता-पुत्रांचा काँग्रेसला दे धक्का! फडणवीसांची खेळी यशस्वी
मुंबई : खरा पंचनामा
सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्यातच आज नाशिक पदवीधर मतदार संघात घडलेल्या घटनेने राजकीय आखाड्यात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षावर नामुष्की ओढावल्याचे बोलले जात आहे. संगमनेरच्या तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेसला जोरदार धक्का दिल्याची चर्चा आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यासाठीचा एबी फॉर्म देखील पक्षाकडून देण्यात आला. पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, यासाठी आपण महाविकास आघाडीसोबतच भाजपचा देखील पाठिंबा मागू असे सुचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. काही दिवसांपासून सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यात अखेरच्या क्षणापर्यंत तांबे पिता-पुत्रांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. वेळ संपण्याच्या अवघी काही मिनिटे अगोदर हे पिता-पुत्र अर्ज दाखल करण्यासाठी आले. पण नेमका फॉर्म भरणार कोण? असा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत निर्माण झाला होता. फॉर्म भरल्यानंतर बाहेर येवून माध्यमांशी संवाद साधत हा सस्पेन्स या दोघांनी मिटवला.
तांबे पिता-पुत्रांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाची मोठी अडचण झाली आहे. पण या विषयी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका वक्तव्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. ७ डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी सत्यजीत तांबे यांच्या सिटीझनविल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना एक सूचक वक्तव्य केले होते. त्यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी बोलल्याप्रमाणे करून दाखवले. अशी चर्चा आहे.
या कार्यक्रमात फडणवीसांनी बाळासाहेब थोरातांना हसत हसत एक इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, ‘खरंतर बाळासाहेब माझी तक्रार आहे, तुम्ही किती दिवस असे नेते बाहेर ठेवणार आहात. जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो. चांगली माणसं जमाच करायची असतात.’ त्यानंतर उपस्थितांमध्ये प्रचंड हाशा पिकला होता.
फडणवीस यांच्या विधानानंतर सत्यजीत तांबेंनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला दुजोरा देत एक सूचक वक्तव्य केले होते. सत्यजीत तांबे म्हणाले होते की, ‘देवेंद्र फडणवीसांना चांगल्या लोकांची पारख आहे.’ त्यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क वर्तविण्यात येत होते. त्यावर आज भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवार न दाखल केल्यामुळे यात काँग्रेसचाच बळी देण्यात आल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.