राष्ट्रवादीच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न : जयंत पाटील
मुंबई : खरा पंचनामा
ईडीने बुधवारी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर छापा टाकला. मुश्रीफ घरी नसताना ईडीकडून छापा टाकल्याने मुश्रीफ समर्थक चांगलेच आक्रमक झाले. मुश्रीफ यांच्या विरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केले. त्यावर अगदी काही वेळापूर्वीच एक व्हिडीओ जारी करत आमदार हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता या सर्व प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ही कारवाई ज्या प्रकारे होत आहे, ती प्रचंड राग येण्यासारखी गोष्ट आहे. काहीही केलेले नसताना देखील वारंवार केंद्रीय यंत्रणांचा वापर कुणीतरी मुद्दामहून करत आहे, असा एकंदरीत अर्थ या सर्व प्रकाराचा होतो. याचीच जाणीव झाल्यामुळे कार्यकर्त्यांना राग अनावर झाला आहे. त्याचे ते प्रदर्शन करत आहेत. तुम्ही आयकर विभागाची धाड टाकली त्यात काहीच मिळाले नाही. आता नवीन काहीतरी प्रकरण काढून ईडीची धाड टाकायची. या सगळ्या गोष्टी लोकांना कळतात म्हणूनच याविरोधात लोक रोष व्यक्त करत असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.
तसेच सध्या सत्तेत बसलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल प्रचंड असूया दिसत आहे. राष्ट्रवादीच आपल्याला आव्हान देऊ शकते, अशी भावना त्यांच्यात दिसते आहे. कारण एकामागोमाग एक राष्ट्रवादीच्या नेत्यांना येनकेन प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न दिसतोय. आणि त्यासाठीच यंत्रणांचा वापर सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी सत्ताधारी पक्षावर केला.
ते म्हणाले की, हसन मुश्रीफ यांची आत्तापर्यंतची कारकीर्द ही अतिशय पारदर्शक आणि स्पष्ट आहे. लोकांमधला नेता अशी त्यांची प्रचिती आहे. याआधी त्यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली होती. त्याला बराच कालावधी उलटला आहे. मला वाटतं अशाप्रकारे राजकीय दृष्टीकोन ठेवून कारवाई होणं, हे भारतात, महाराष्ट्रात पुर्वी कधीच झालं नव्हतं. हा नवीन उपक्रम सुरु झालेला आहे. मात्र यंत्रणांनी अशाप्रकारे राजकीय व्यक्ती टार्गेट करुन कारवाई करणे बरोबर नाही. आज महाराष्ट्र आणि देश यंत्रणाचा कसा गैरवापर सुरु आहे, हे पाहतोय असे देखील जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, कारखाना चालवायला देणे यात गैर काय? उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यावर आरोप करणे म्हणजे बालिश आरोप
असल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी किरीट सोमय्या यांना लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.