पोलिसांप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार पदके!
मुंबई : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोलिसांप्रमाणेच जोखमीचे काम करतात. त्यामुळे आता पोलिसांसारखी पदके देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरवर्षी 26 जानेवारीला ही पदके प्रदान करण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या समित्या शासनाकडून नियुक्त करण्यात आल्या आहेत. राज्य शासनामार्फत आणि उत्पादन शुल्कच्या आयुक्तांच्या मार्फत ही पदके दिली जाणार आहेत.
पोलिसांप्रमाणे कर्तृत्व/साहस/धाडस/योग्य तपास या निकषांवर पदकासाठी निवड करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य शासनाकडून 2 गुणवत्तापूर्ण सेवा पदके, विशेष मोहिमाबद्दल 1, उत्कृष्ट तपासासाठी 4, आयुक्तांकडून आयुक्त सन्मानचिन्ह 5, विशेष सेवा पदके 6 अशी एकूण 18 पदके देण्यात येणार आहेत.
यासाठी शासनाने शिफारस समित्या स्थापन केल्या आहेत. राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या पदकांसाठी प्रधान सचिव, सचिव, उपसचिव, आयुक्त, सह आयुक्त यांची समिती नावांची शिफारस करणार आहे. आयुक्तांमार्फत दिल्या जाणाऱ्या पदकांसाठी आयुक्त, सह आयुक्त, दोन वरिष्ठ उपायुक्त, राज्याचे संचालक यांची समिती नावांची शिफारस करणार आहे.
या दोन्ही समित्यांनी दि. 15 जानेवारी पर्यंत शिफारस करावी असे शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान या पदकांसाठी किमान सेवा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने मंगळवारी काढण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.