जातीवाचक शिवीगाळ करत फिर्यादीलाच रात्रभर मारहाण: एपीआयविरोधात गुन्हा!
नवी मुंबई : खरा पंचनामा
चायनिज हॉटेल चालकाकडून मारहाण झाल्यानंतर जखमी झालेला तरुण पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेला. मात्र सहायक पोलीस निरीक्षकांनी चायनिज हॉटेल चालकाला पाठीशी घालत तक्रार देण्यासाठी आलेल्या जखमी तरुणालाच जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात घडली आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार देण्यास आलेल्या व्यक्तीला मारहाण करणे, अपमानास्पद वागणूक देणे इत्यादी कलमांतर्गत दिनेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही.
याबाबत विकास उजगरे यांनी फिर्याद दिली आहे.
उजगरे एका रुग्णालयात काम करत असून दि. 6 जानेवारीला काम संपवून काही मित्रांसोबत त्यांनी पार्टी केली. त्यानंतर ते सुधागड महाविद्यालयाजवळ असलेल्या दत्तकृपा चायनीज हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. जेवण करत असताना त्यांचा मित्र तुषार यादव आणि वेटर यांच्यात ऑर्डर घेण्यावरुन शाब्दिक बाचाबाची झाली. यात विकास यांनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद वाढू दिला नाही.
काहीवेळाने ते निघून गेले मात्र यादव यांनी पिशवी हॉटेल वरच विसरल्याचे लक्षात आल्यावर विकास हे पिशवी आणण्यासाठी गेले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी विकास यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या तावडीतून सुटका करुन त्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करुन मदत मागितली. त्यावेळी पोलीस त्या ठिकाणी आले. त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले.
त्यामुळे विकास उजगरे चालत कळंबोली पोलीस ठाण्यात आले. परंतु ते पोलीस ठाण्यात पोहचण्यापूर्वीच हॉटेल मालक निलेश भगत व एक कामगार त्या ठिकाणी पोहचले होते. मारहाण झाल्यामुळे विकास यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांनी रुग्णालयात जाण्याची विनंती केली. मात्र सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांनी विकास यांची तक्रार नोंदवून घेतली नाही तर त्यांना रुग्णालयात देखील नेले नाही.
उलट त्यांनाच कमरपट्ट्याने मारहाण केली आणि जातीवाचक उल्लेख करुन त्यांच्या अंगावर थुंकले.
दिनेश पाटील हे पहाटेपर्यंत विकास यांना मारहाण करत होते. काही वेळाने विकास याच्या परिचित पोलीस कर्मचाऱ्याने विकास हा पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांचा नातेवाईक असल्याची माहिती दिली. त्यानंतर दिनेश पाटील यांनी विकास यांच्याशी गोड बोलून त्यांना रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या विकास यांनी तीन दिवस रुग्णालयात उपचार घेतले. यादरम्यान त्यांची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याच्या अर्जावर बळजबरीने सही घेण्यात आली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.