सांगली जिल्हा बँक चौकशीसाठी चौघांची समिती
सांगली : खरा पंचनामा
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी कोल्हापूरच्या सहनिबंधकांना याबाबतचे आदेश दिले आहेत.
या चौकशीचा अहवाल ३१ जानेवारीपर्यंत सादर करण्याच्याही सुचना कवडे यांनी दिल्या आहेत. जिल्हा बँक इमारत नूतनीकरण, फर्निचर, एटीएम खरेदी, शाखा नूतनीकरण अशा अनावश्यक बाबींवर ३० ते ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले, असे आरोप जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि शिराळ्याचे राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले होते. तसंच बँकेच्या नोकर भरतीत घोटाळा आणि कर्ज वाटपात अनियमितता झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
नाईक यांच्यासह तत्कालिन ९ संचालकांनी याबाबत सहकार विभागाकडे लेखी तक्रारही दाखल केली होती. स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल फराटे यांनीही याबाबतची तक्रार केली होती. नाईक यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय दिलीप पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळेच हा जयंत पाटील यांना धक्का मानला जात आहे. २०२१ मध्ये नाईक बँकेचे अध्यक्ष झाले.
मानसिंगराव नाईक आणि सुनिल फराटे यांच्या पत्राची दखल घेत सहकार विभागाने तात्काळ चौकशी समिती नियुक्त केली होती. मात्र, चौकशी समिती नियुक्तीला २४ तास उलटण्यापूर्वीच तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली होती.
दरम्यान, शिंदे सरकारने ३१ डिसेंबर रोजी हे स्थगिती आदेश मागे घेत पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात समितीही नियुक्त करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.