वेकोलीतील अधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयचे छापे!
नागपूर : खरा पंचनामा
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोली) एका अधिकाऱ्याच्या नागपुरातील घरावर आणि उमरेड येथील कार्यालयावर मंगळवारी सीबीआयने छापे टाकले. यामध्ये सीबीआयने अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त केल्याचे सांगण्यात आले. मनोज पुनिराम नवले असे अधिकाऱ्याचे नाव आहे.
मनोज नवले हे बल्लारपूर-चंद्रपूर येथील वेकोलीमध्ये नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नवले यांच्याकडे कोळसा खाण प्रकल्पाच्या शेतजमिनीबाबतची अनेक प्रकरणे आहेत. पैसे घेतल्याशिवाय कोणतीच कामे नवले करत नसल्याची अनेकांची तक्रार होती.
नवले यांनी मंजुरी दिलेल्या काही शेतजमिनीच्या अधिग्रहण प्रकरणात कोट्यवधीची कमाई केल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यामुळे नवले यांनी बेकायदेशीरमार्गाने कमावलेली संपत्ती जास्त असल्याची तक्रार सीबीआयकडे प्राप्त झाली होती.
सीबीआयचे पोलीस उपनिरीक्षक एम. एस. खान यांनी 29 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता. नवले यांना नोटीस देऊन घराची आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. नवले यांना कार्यालयात जाण्यास मनाई करण्यात आली असून त्यांच्या घरासमोर सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नवले यांच्या खुल्या चौकशीत सीबीआयला लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे.
नवले यांच्याकडे एकूण कमाईच्या 67 लाख 7 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम आढळून आली आहे. त्यामुळे सीबीआयने नवले यांना ताब्यात घेतले आहे. तसेच नवले यांची पुढील चौकशी सुरु आहे. तसेच प्राप्त दस्तावेजाच्या आधारे ही रक्कम वाढण्याचीही शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.