सांगलीवरील संक्रांत जाणार कधी?
लोकप्रतिनिधींची अनास्था सांगलीकरांच्या मुळावर?
सांगली : खरा पंचनामा
आज राज्यभरात मकर संक्रांत उत्साहात साजरी होत आहे. मात्र सांगली जिल्हा आणि सांगली, मिरज शहरातील लोकांवरील संक्रांत जाणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. कवलापूर विमानतळ, सांगलीतील शेरीनाला, महापूर, क्षारपड जमीन, मिरजेतील रस्ते, ड्रेनेज योजना, दुष्काळी भागातील पाणी योजना असे अनेक प्रश्न जिल्ह्यात अजूनही आहेत. लोकप्रतिनिधी यांची अनास्था आणि सांगली शहरावर असलेला त्यांचा राग सांगलीकरांच्या मुळावर उठत आहे.
सांगली जिल्ह्याने वसंतदादा यांच्या रूपाने मुख्यमंत्री म्हणून राज्याला दूरदृष्टी असलेले नेतृत्व दिले. दुसरीकडे राजारामबापू यांच्या रूपाने दुष्काळी जनतेचे प्रश्न मांडणार पदयात्री दिला. नागनाथ अण्णा, जीडी बापू अशी कितीतरी रत्ने सांगलीच्या मातीने राज्याला दिली. मात्र सांगलीची आजही वाताहत होत आहे.
जिल्ह्याने राज्याला दिलेली नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर या नेतृत्वाचे बोट धरून राजकारणात आलेल्या आणि नंतरच्या काळात राज्याचे नेतृत्व केलेल्या नेत्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील गावे, शहरे आणि संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट केला आहे.
त्यांच्यासोबतच राजकारणात आलेले सांगली जिल्ह्यातील नेते मात्र जिल्ह्याचा विकास करण्यात कमी पडल्याचे दिसत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख कधी काळी सांगलीचे पालकमंत्री होते. नंतर ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी केलेला लातूरचा विकास आजही डोळ्यात भरतो. तीच बाब अशोक चव्हाण यांनाही लागू होते. विरोधी पक्षात असूनही गोपीनाथ मुंडे, सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या शहरांसह जिल्ह्याचा विकास केला आहे.
विदर्भ, मराठवाडाच नव्हे तर शेजारच्या कोल्हापूर, सातारा जिल्ह्यानेही विकासात बाजी मारली आहे.
विशेष म्हणजे कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांकडे राज्य शासनात वजनदार खाती नव्हती तरीही या दोन्ही जिल्ह्यातील विकास वाखाणण्याजोगा आहे.
2014 पूर्वी सांगली जिल्ह्यात चार वजनदार मंत्री आणि एक केंद्रीय राज्यमंत्री अशी ताकद होती. पण यातील कोणालाही जिल्ह्यातील मूलभूत प्रश्न सोडवताच आले नाहीत अशी सांगलीकरांची भावना आहे. जिल्ह्यातील पाणीप्रश्न, रस्ते याबाबत आजही लोकप्रतिनिधी उदासीन आहेत, असेच चित्र आहे.
आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधीनी केवळ सांगली शहरावर रागच काढला आहे अशी लोकभावना तयार होत आहे. आघाडीचे सरकार असताना कृष्णा नदीकाठी विमानतळ करण्याचा डांगोरा पिटण्यात आला. त्यामुळे कवलापूर विमातळाचे डागडुजी, नूतनीकरण असे मुद्देच बाहेर पडले.
कवलापूरच्या विमानतळाची जागा योग्य नाही असे भासवण्यासाठी तेथे आरटीओ कार्यालय, जिल्हा कारागृह असे विविध प्रस्ताव देऊन त्या जागेचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला. तेच राजकारण सांगलीतील शेरीनाला, मिरजेतील रस्ते यांच्याबाबतही आहे.
सांगली शहरात एकही कणखर नेतृत्व नाही. सांगली शहर केवळ वसंतदादा यांचे आहे म्हणून की वजनदार नेत्यांना केवळ त्यांच्याच मतदारसंघात विकास करायचा आहे म्हणून सांगलीवर अन्याय होत आहे का असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहेत.
सांगलीचा दुस्वास करणाऱ्या नेत्यांना इतर जिल्ह्यातील नेते, त्यांचे कार्यकर्ते सांगलीच्या बकालपणाबद्दल विचारत नसतील का असा प्रश पडतो.
मात्र सामान्य सांगलीकरांना बाहेरच्या जिल्ह्यातील नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी राजकिय नेते, कार्यकर्ते यांना या प्रश्नावर उत्तरे द्यावी लागत आहेत.
त्यामुळे सांगलीचा विकास हे लोकप्रतिनिधी करणार की केवळ मतदारसंघातच लक्ष देणार असा प्रश्न आहेच.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.