मिरजेतील 'त्या' जागेबाबत शुक्रवारी सुनावणी
सांगली : खरा पंचनामा
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांच्या मिरजेतील "त्या" वादग्रस्त जागेबाबत आता शुक्रवारी निकाल होण्याची शक्यता आहे. त्या जागेबाबत तहसीलदारांपुढे होणारी आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान जागेच्या सुनावणीला आता वेगळे वळण लागले आहे. तिघा मिळकतधारकांनी पडळकर यांच्या मालकीची जागा असल्याचे स्पष्ट करत त्यांच्याविरोधात तक्रार नसल्याचा अर्ज तहसीलदारांच्या समोर सादर केला आहे.
ब्रह्मानंद पडळकर यांनी जागेचा ताबा मिळवण्यासाठी मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील सुमारे आठ मिळकती रातोरात जमीनदोस्त केल्या होत्या. चार जेसीबी आणि हजारोंचा जमाव घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल, दुकान, मेडिकल, पान शॉप असे आठ बांधकाम जमीनदोस्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला होता. त्यानंतर जागेच्या मालकीचा वाद पुढे आला होता.
या प्रकरणी मिरज तहसीलदारांसमोर सुनावणी सुरु आहे. आतापर्यंत दोनवेळा सुनावणीला मुदतवाढ मिळाली आहे. जागेच्या मालकी पुराव्याबाबत आज गुरुवारी अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, काही मिळकतधारकांकडे जागेचा पुरावा सादर करण्यामध्ये विलंब होत असल्याने आजची सुनावणी देखील उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दुपारपर्यंत याबाबतची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.
कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या जागेबाबत निर्णय देण्यात येईल, असे तहसीलदारांकडून स्पष्ट करण्यात आल्याचे मिळकतधारकांचे वकील नितीन माने यांनी सांगितले.
दरम्यान जागेच्या मिळकत प्रकरणी 17 पैकी तीन जणांनी आता आपले अर्ज माघार घेतले आहेत. जागेवर ब्रह्मानंद पडळकर यांची मालकी असून गैरसमजूतीतून आपण तक्रार दाखल केल्याचा अर्ज तीन मिळकतधारकांनी तहसीलदार दगडू कुंभार यांच्यासमोर सादर केल्याचे पडळकर यांच्या वकीलांनी स्पष्ट केले.
ब्रह्मानंद पडळकर यांनी रात्रीत मिळकती जमीनदोस्त केल्यानंतर मिरजेत संतापाची लाट उसळली होती. पडळकरांनी केलेल्या कृत्यानंतर मिरज बंदची हाक देण्यात आली होती. यानंतर राष्ट्रवादीने पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. कोणत्या राजकीय नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे घडले याचा तपास करुन सोक्षमोक्ष लागला पाहिजे, अतिक्रमण काढण्याचा कायद्याने अधिकार कोणाचा? उद्या एखादी घटना घडली तर प्रशासन स्वतः कारवाई करणार की ज्याचा त्याला रस्त्यावर न्याय निवाडा करायला सांगणार? अशी विचारणा केली होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पाडकामात पोलीस आणि प्रशासनाचा हात असल्याचा आरोपही केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.