Breaking News

KP Banner

M4U News

कवलापूर विमानतळप्रश्नी ज्योतिरादित्य शिंदे यांना साकडे!

कवलापूर विमानतळप्रश्नी ज्योतिरादित्य शिंदे यांना साकडे!



सांगली : खरा पंचनामा 

कवलापूर येथे विमानतळासाठीची १६० एकर जागा पुन्हा विमान प्राधीकरणाने ताब्यात घ्यावी. या जागेवर विमानतळ व्हावे यासाठी सर्वेक्षण सुरु करावे. आरक्षित धावपट्टीसह संपूर्ण क्षेत्राला कुंपण घालून जागेच्या बाजाराचे नियोजन थांबवावे, अशी मागणी विमानतळ बचाव कृती समितीने आज केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली. याबाबत समितीचे सतीश साखळकर यांनी माहिती दिली. 

कवलापूर विमानतळाच्या जागेचा औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरु असलेला बाजार आधी उधळून लावू आणि मग विमानतळाचा पाठपुरावा करू, असा निर्धार पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखालील कृती समितीने केला होता. परंतू, विमानतळ जागेबाबतची माहिती समोर येत असताना आणि त्याला लोकांचा वाढता पाठींबा लक्षात घेता समितीने हालचाली अधिक गतीमान केल्या आहेत. श्री. शिंदे यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधून ही जागा विमान प्राधीकरणाने पुन्हा ताब्यात घ्यावी, यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. 

माजी आमदार नितीन शिंदे यांनीही कवलापूर, बुधगावच्या स्थानिक जनतेची एकजूट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विमानतळाबाबतची संपूर्ण तांत्रिक बाजू सतीश साखळकर यांनी हाती घेतली आहे. ही मजबूत एकजूट यशस्वी होईल, असा विश्‍वास घेऊन ते काम करत आहेत.   

साखळकर म्हणाले, ‘‘केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे प्रचंड अधिकार आहेत. त्यांचे व्हिजन मोठे आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ असले पाहिजे, या दृष्टीने मांडणी सुरु असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आम्हाला कवलापूरात विमानतळ होऊ शकते, याबाबत आम्हाला आत्मविश्‍वास वाटू लागला आहे. त्यासाठी आधी ही जागा वाचवली पाहिजे. औद्योगिक विकास महामंडळ या जागेचा बाजार करण्यासाठी हालचाली करत आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. त्याविरोधात प्रसंगी न्यायालयात जावू. त्याचवेळी जागेचे करायचे काय? असा प्रश्‍न काहीजण उपस्थित करत आहेत. आमची भूमिका अत्यंत स्वच्छ आहे, इथे विमानतळच झाले पाहिजे. तीच भूमिका आम्ही श्री. शिंदे यांना दिलेल्या निवेदनात मांडली आहे.’’ हेच निवेदन विमान प्राधीकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. 

अशा आहेत मागण्या : 
  
- कवलापूरची १६० एकर जागा विमानतळ प्राधीकरणाकडे परत घ्या 
- आरक्षित धावपट्टीची डागडुजी करून घ्या - संपूर्ण क्षेत्राला कुंपन भिंत बांधून जागा सुरक्षित करा 
- विमान प्रशिक्षण किंवा छोटे विमान उतरण्यासाठी त्याचा वापर सुरु करा 
- वायूसेना, नौसेनेची विमाने येथे उतरवायला सुरवात करा 
- अतिरिक्त जमिन खरेदीसाठीची प्रक्रिया सुरु करा

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.