आजही कवलापूर विमानतळाच्या खुणा अस्तित्वात!
सांगली : खरा पंचनामा
कवलापूर येथील विमानतळाच्या जागेवर आज विमानतळ जागा बचाव कृती समिती नेत्यांनी भेट दिली. स्थानिकांनी तेथील जागेविषयी सविस्तर माहिती दिली. जागेची पाहणी करताना जुन्या काळात येथे अस्तित्वात असलेल्या विमान धावपट्टीच्या खुणा सापडल्या. धावपट्टीसाठीचे डांबरीकरण आजही तेथे कायम आहे. शिवाय, विमान जेथून उड्डाण करायचे, तो दगडही अस्तित्वात आहे. येथे पुन्हा विमानतळ होणार असेल तर कवलापूरची जनता स्वागतच करेल, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
कृती समितीचे नेते, माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर यांनी आज विमानतळ जागेची पुन्हा पाहणी केली. कवलापूरचे नागरीक पी. आर. पाटील, प्रदीप पाटील, शिवाजीराव पाटील, संतोष माळकर, अशोक पाटील, तानाजी पाटील, भूषण गुरव आदी प्रमुख मंडळी उपस्थित होते.
समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांनी औद्योगिक वसाहतीसाठी जागा विक्रीला विरोध करतानाच धावपट्टीसाठी आवश्यक जमिन खरेदीची मागणी केली आहे. त्याचवेळी खासदार संजय पाटील यांनी विमानतळासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आता सकारात्मक विचार सुरु झाल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत. त्यांची भेट श्री. शिंदे आणि श्री. साखळकर यांनी घेतली. यावेळी कवलापूरातील नागरिकांनी स्थापन केलेल्या कृती समितीचे नेते शिवाजीराव पोळ यांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे. कवलापूरमध्ये विमानतळ व्हावे, ही इथल्या जनतेची इच्छा आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळाले तर विकासाला हातभार लागेल, अशी भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
नितीन शिंदे म्हणाले, ‘‘कवलापूरच्या १६० एकर जागेवर आधी विमाने येत होती. येथे धावपट्टीच्या पाऊलखुणा आहेत. त्याअर्थी विमान येथे येऊ शकते, हे स्पष्ट आहे. पन्नास वर्षापूर्वीपेक्षा आता तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. त्यामुळे तेंव्हा जे शक्य होते, ते आज शक्य नाही, असे म्हणण्याचा वेडेपणा कुणी करू नये. येथे विमान उतरू शकते आणि त्यासाठी आवश्यक अतिरिक्त जमिन अधिग्रहित करायला कुणी विरोध करणार नाही. लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.’’
सतीश साखळकर म्हणाले, ‘‘धावपट्टीसाठी अतिरिक्त जमिन अधिग्रहण हा अडचणीचा विषय राहणार नाही, असे आजच्या पाहणीतून समोर आले आहे. लोक उत्सुक आहेत. शासनाने फक्त एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. त्यासाठी आम्ही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेणार आहोत.’’
नेहरू, इंदिराजींचे विमान उतरले होते
ज्येष्ठ नागरीक शिवाजीराव पोळ म्हणाले, ‘‘माझे वय ७७ वर्षे आहे. मी तरुण होतो तेंव्हा या जागेवर विमान उतरत होते. माजी पंतप्रधान पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांची विमाने येथे उतरली होती. किर्लोस्करांची खासगी विमाने येथे यायची. आजही आमच्या डोळ्यासमोर ते चित्र आहे.’'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.