शीना बोरा आजही जिवंत?
मुंबई : खरा पंचनामा
संपूर्ण देशभर गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या हायप्रोफाईल हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने शीना जिवंतच असून, तिला दोन वकिलांनी गुवाहाटी विमानतळावर फिरताना पाहिले, असे म्हटले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. जर शीना बोरा खरच जिवंत असेल या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
इंद्राणीने यासंदर्भात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयामध्ये अर्ज देऊन माहिती दिली आहे. गुवाहाटी विमानतळ परिसरात फिरणारी ती तरुणी शीना बोरा हीच आहे हे सिद्ध करण्यासाठी विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात यावे, याबाबत न्यायालयाने सीबीआयला आदेश द्यावेत, अशी विनंती इंद्राणीने केली आहे.
शीना बोरा हत्याकांडाचा खटला सध्या विशेष सीबीआय न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी साक्षीदार राहुल मुखर्जीची उलट तपासणी घेण्यात आली. इंद्राणीचे वकील रणजीत सांगळे यांनी राहुलच्या दाव्यातील अनेक विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान ही इंद्राणीच्या वकिलांनी शीना ही जिवंत असल्याचे पटवून देण्याच्या अनुषंगाने युक्तिवादही केला.
या सर्व पार्श्वभूमीवर खटल्यात नवीन ट्विस्ट देणारा दावा इंद्राणीने केला आहे. आयएनएक्स मीडियाची माजी वकील सविना बेदी यांनी शीना बोरा ही गुवाहाटी विमानतळावर दिसल्याचे म्हटले आहे. बेदी या इंद्राणी मुखर्जीच्या आधीच्या वकील आहेत. त्यांनी हा दावा करतानाच इंद्राणीच्या अर्जासोबत आपले प्रतिज्ञापत्र देखील जोडले आहे.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, इंद्राणी मुखर्जीने तिचा कारचालक शाम राय आणि आधीचा पती संजीव खन्ना यांच्या मदतीने शीनाची गळा आवळून हत्या केली. एप्रिल 2012 मध्ये हे हत्याकांड करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.