Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत दरोडाप्रकरणी तिघांना अटक : डॉ. तेली

सांगलीत दरोडाप्रकरणी तिघांना अटक : डॉ. तेली



सांगली : खरा पंचनामा

सांगली शहरातील कर्नाळ रस्त्यावरील एका बंगल्यात पहाटे तीनच्या सुमारास टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील तिघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर येथून अटक केली आहे. संशयितांची आंतरराज्य टोळी असून नऊ जणांचा सहभाग आहे. अटक केलेल्या तिघांच्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, त्यांच्यावर छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा, राजस्थान या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांकडून दरोड्यातील पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

अनिल उर्फ अन्या युवराज पिंपळे (वय ४९, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), तुकाराम भिमराव घोरवडे (वय ५४ रा. उंडे वस्ती मातापूर, ता. श्रीरामपूर ) आणि दाजी धनराज सोळंके (वय ३६ रा. हरसुल गायरान नं १ लासूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. २३ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कर्नाळ रस्त्यावरील आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडला होता. चोरट्यांनी मागील बाजूस असलेल्या लोखंडी दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील आशिष यांच्यासह त्यांच्या आईला हत्याराचा धाक दाखवून अवघ्या काही मिनिटात घरातील तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख दोन लाख असा ऐवज लंपास करुन पोबारा केला होता.

प्रतिकार करण्याचा प्रयत्न करु नये याकरिता चोरट्यांनी घरात असणाऱ्या आशिष चिंचवाडे यांचे हात पाय बांधले होते. दरोडा टाकून जाताना परिसरातील सीसीटिव्हीत चोरटे कैद झाले होते. तसेच फिर्यादींनी सांगितल्यानुसार रेखाटलेल्या रेखाचित्राच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला होता. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन तीन पोलिस पथके जिल्ह्यासह परजिल्ह्यात देखील तातडीने रवाना करण्यात आली होती. कर्नाळ येथे पडलेला दरोडा अहमदनगर, औरंगाबाद व बाहेरच्या राज्यातील संशयीत आरोपींनी केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने श्रीरामपुर आणि औरंगाबाद परिसरात छापे टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता संशयीत दाजी सोळंके याने नऊ जणांच्या टोळीने चिंचवाडे यांच्या घरावर दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी यापैकी तिघांना अटक केली. संशयीत तिघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

संशयितांकडून पोलिसांनी ९९ ग्रॅम वजनाचे पाच लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या गुन्ह्यातील अन्य सहा आरोपी अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. यावेळी अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल, उपाधीक्षक अजित टिके उपस्थित होते.

या कारवाईत एलसीबीचे निरिक्षक सतीश शिंदे, शहरचे निरीक्षक अभिजीत देशमुख, सहायक निरीक्षक गजानन कांबळे, झाकीरहुसेन काझी, अरिफ मुजावर, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे यांचा सहभाग होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.