मिरजेत दुध संकलन पर्यवेक्षकास एक हजाराची लाच घेताना अटक
सांगली : खरा पंचनामा
दुध उत्पादक सहकारी संस्था संचालक मंडळाच्या झालेल्या बिनविरोध निवडणूकीत निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीची कागदपत्रे देण्यासाठी एक हजार घेताना दुध संकलन पर्यवेक्षकास रंगेहात पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
दीपक श्रीपती बुरुटे (वय ४६ रा. पूर्व म्हाडा कॉलनी, स्वामी समर्थ मंदिरानजीक, मिरज ) असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक झालेली आहे. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक बुरुटे याने कार्यभार सांभाळला होता. निवडणुकीमध्ये संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीची कागदपत्रे देण्याकरीता बुरूटे याने तक्रारदार यांचेकडे एक हजार रूपये लाचेची मागणी केली. त्याबाबतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी २३ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली कार्यालयात दिला होता.
तक्रारीनुसार विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, त्यात बुरुटे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज बुरूटे याच्या विरूध्द मिरजेतील जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी बुरुटे यास तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून एक हजार रूपये लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. बुरुटे याच्याविरुध्द महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.