विट्यातील घरफोडी प्रकरणी एकाला अटक: साडेआठ लाखांचे दागिने जप्त
विटा : खरा पंचनामा
विट्यातीत मायणी रस्ता परिसरातील बंद घर फोडून दागिने चोरल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे 8 लाख 57 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अभिजीत वसंत ठोंबरे (वय २२, रा. मंजुनाथ निवास चाळ, मुंढे मळा, विटा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी १ ते दि. १ जानेवारीच्या रात्री साडेनऊच्या दरम्यान तेजस गिरीधर तारळेकर (रा. यशवंतनगर, विटा) यांच्या मायणी रोड येथील बंद घरात अज्ञाताने प्रवेश करुन घरातील लोखंडी तिजोरीतील सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेले होते. याबाबत दि. २ जानेवारी रोजी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर निरीक्षक संतोष डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण पथक विटा परिसरात गस्त घालत असताना दि. 17 जानेवारी रोजी पथकामधील अमर सुर्यवंशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक संशयित साळशिंगे रोड येथे संशयास्पदरित्या फिरत आहे. त्यानंतर पथकाने संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आठ लाख सत्तावन्न हजार रुपये किंमतीचे २८१.०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ४३९.१३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने जप्त करणेत आले आहेत.
पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त पोलीस अधिक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.