लाच घेताना सापडल्यास फोटो, नाव माध्यमात नकोच!
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी लाच घेताना पकडले जातात. लाच घेण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे.
अगदी किरकोळ कामांसाठी लोकांना वेठीस धरुन लाचखोरीचं प्रमाण वाढलं असताना अधिकारी महासंघानं मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या एका मागणीची सध्या चर्चा सुरु आहे.
लाच घेताना अधिकाऱ्यांना किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना पकडल्यास न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत त्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्याचं नाव पेपरमध्ये किंवा माध्यमांमध्ये देऊ नका, अशी मागणी महासंघानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात एक पत्र महासंघानं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.
यात म्हटलं आहे की, राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संदर्भात संबंधित विभागाकडून त्या संशयित कर्मचाऱ्याचे नाव आणि छायाचित्र माध्यमांमध्ये दिलं जातं. आजपर्यंतच्या अशा प्रकरणांमध्ये न्यायालयीन निवाड्यांचे अवलोकन केलं असता कारवायांमध्ये अटक केलेले सर्वच संशयित हे दोषी नसल्याचं आढळून आलं आहे, असं पत्रात म्हटलं आहे.
पत्रात म्हटलं आहे की, कालांतराने हे कर्मचारी न्यायालयात निर्दोष सुटतात, मात्र कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळं संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बदनामी आणि रोषाचा सामना करावा लागतो. त्यांच्या निष्पाप कुटुंबियांची देखील समाजात मानहानी होते आणि सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचते.
न्यायालयातून निर्दोष सुटल्यानंतरही सदरची गेलेली प्रतिष्ठा आणि मानसिक नुकसान भरुन निघत नाही. त्यामुळं संबंधित कर्मचाऱ्यांच्या मानवाधिकारांचे हनन करणारी ही बाब असून यामुळं त्या कर्मचाऱ्यासह त्यांच्या कुटुंबियांवरही मोठा अन्याय होत असल्याचं महासंघानं पत्रात म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.