मिरजेतील प्रकरणात अजितदादा लक्ष घालणार?
मिरज : खरा पंचनामा
मिरज बसस्थानक परिसरातील हॉटेल्स, गाळे, इमारती मध्यरात्री पाडण्यात आल्या. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाने ही बांधकामे पाडल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी तहसीलदार यांच्याकडे सोमवारी सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांना जैसे थे परिस्थिती ठेवण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणी मिरजेतील कारभारी, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मूग गिळून गप्प असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे मिरजेतील या प्रकरणात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार तरी लक्ष घालणार का? असा प्रश्न पीडित कुटुंबे विचारत आहेत.
आमदार पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनी महापालिकेच्या नोटीसीनंतर बांधकामे पाडल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे ही कारवाई महापालिकेने केल्याचेही सांगितले जात आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही कारवाई केल्याचे पडळकर सांगत आहेत. त्यामुळे त्या जागेची नेमकी मालकी कोणाची तसेच कोण कायदेशीररित्या बरोबर आहे याची चर्चा आता सुरू आहे.
पाडकाम केल्यानंतर तहसीलदारानी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आणि दोन्ही गटांनी वादग्रस्त जागेत न येण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांनी दोन्ही गटांना बाजू मांडण्यासाठी मुदत दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान बांधकामे पाडल्यानंतर मिरजेतील काही कारभारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सरकार आमचे नाही त्यामुळे काही करू शकत नाही असे म्हणत तेथून पळ काढला. त्यामुळे आता राज्यातील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे यात अजितदादा लक्ष घालणार की नाही याची उत्सुकता मिरजकरांना लागली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.