मुंबई-गोवा महामार्गावर 2 कोटींची गोवा बनावटीची दारू जप्त
कुडाळ : खरा पंचनामा
मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली येथील तपासणी नाक्यावर तब्बल 2 कोटींची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने विभागीय उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. यात दारुसह कंटेनर जप्त करून कर्नाटकातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
राजशेखर सोमशेखर परगी (वय 41, रा. हुबळी), रहमतुल्लाह कासीम खान (वय 41, रा. कारवार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. तडवी यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पथक कार्यरत होते.
गुरुवारी एक कंटेनर गोवा बनावटीची दारू घेऊन जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने इन्सुली येथील तपासणी नाक्यावर सापळा रचला होता. माहितीनुसारचा कंटेनर आल्यानंतर तो थांबवून त्याची झडती घेण्यात आली. त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे 2 कोटी रुपयांचे 3 हजार बॉक्स सापडले. याप्रकरणी परगी, खान यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.
पथकाने दोघांना अटक करून दारू, कंटेनर असा सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. ही दारू कोठे नेली जात होती याचा तपास राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी करत आहेत. विभागीय उपायुक्त डॉ. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडळकर, संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक राहुल मोरे, रमाकांत ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.