40 हजारांची लाच प्रकरणी विधी अधिकाऱ्याला अटक
पुणे : खरा पंचनामा
नवीन इमारतीमधील विजेच्या मीटरबाबत जागा मालकाने घेतलेल्या हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणारा महावितरणचा विधी सल्लागार व सहायक विधी अधिकारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
विधी सल्लागार सत्यजीत विक्रम पवार (रास्ता पेठ महावितरण कार्यालय) आणि विधी अधिकारी समीर रामनाथ चव्हाण (गणेशखिंड महावितरण कार्यालय) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पिंपरी गावातील जमीन मालक व बांधकाम व्यावसायिक यांचा करार होऊन त्यानुसार बांधकाम व्यावसायिकाने नवीन इमारत बांधली. या दरम्यान, जागा मालक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात या इमारतीतील गाळे देण्या-घेण्यावरुन आर्थिक वाद झाला. बांधकाम व्यावसायिकाने या नवीन इमारतीत विजेचे मीटर्स देण्यासाठी महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. त्यापैकी ११ मीटर्सला जागा मालकाने हरकत घेतली. त्यात कायदेशीर बाब आल्याने हा हरकत अर्ज गणेशखिंड रोडवरील सहायक विधी अधिकारी समीर चव्हाण याच्याकडे गेला. त्यांनी तो सल्ल्यासाठी रास्ता पेठ कार्यालयातील विधी सल्लागार सत्यजीत पवार याच्याकडे पाठविला.
या दोघांनी तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाला अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली. त्यांनी तक्रार दिल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याची पडताळणी केली. त्यात दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयात सापळा रचण्यात आला.
तक्रारदाराकडून ४० हजार रुपये घेताना दोघांना पकडण्यात आले. समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.