अपघाताचा बनाव करून वृद्धाचा खून : सुपारी देणाऱ्यासह 5 जणांना अटक
सांगली : खरा पंचनामा
पलुस पोलीस ठाण्यासमोर दि. २० जानेवारी रोजी एका वृद्धाचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र हा अपघाती मृत्यू नसून सुपारी देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सुपारी देणाऱ्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पलूस पोलिसांनी ही कारवाई केली.
विजय नाना कांबळे (वय ६५, रा.बांबवडे) असे मृताचे नाव आहे. संग्राम राजेंद्र पाटील (वय २२, रा. भवानीनगर, वाळवा), रोहन रमेश पाटील (२४ रा. घोगाव), रूतीक भुपाल पाटील (२२, रा.घोगाव), सुनिल केशवराव घोरपडे (५२ वर्षे, रा. पलूस), अभयसिंह मोहनराव पाटील (४० रा. पलूस) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सर्व संशयितांना १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कांबळे दि. २० जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास पलूस तहसिल कार्यालय ते कराड-तासगाव रस्त्याने निघाले होते. यावेळी पाठीमागून वेगाने आलेल्या इनोव्हा कारने त्यांना जोराची धडक दिली होती. पलुस पोलिसांनी विजय कांबळे यांना उपचाराकरीता मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले होते. हा अपघात प्रत्यक्ष पाहणारे जितेश सुरेश बनसोडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मिरज सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारदरम्यान कांबळे यांचा दि. २१ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता.
गुन्हा घडल्यापासून सहायक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे यांनी पोलीस ठाण्याचा, कुंडलकडे जाणाऱ्या प्रत्येक ठिकाणाचा सिसिटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. यामध्ये विना क्रमांकाची एक इनोव्हा गाडी गेल्याचे स्पष्ट झाले. गाडीचा शोध घेण्यासाठी सांगली, कोल्हापूर येथे पथके पाठवली. तपासात इनोव्हा गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शोध घेवून वाहनाचा मालक निष्पन्न केला व त्यावरुन वाहनाचा क्रमांक एम एच. ०९ डीएम ४०४१ असल्याचे स्पष्ट झाले.
वाहन मालकाकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी ती गाडी २०२१ मध्ये भवानीनगर येथील संग्राम राजेंद्र पाटील यास २ लाख रुपयास गहाण दिले होते असे स्पष्ट झाले. संग्राम पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर पलुस येथील सुनिल घोरपडे, अभयसिंह पाटील यांचेशी त्याचा संपर्क असल्याचे तांत्रिक पुराव्यावरुन स्पष्ट झाले.
मृत कांबळे तसेच अभयसिंह पाटील व सुनिल घोरपडे यांचेत बांबवडे येथील १२ एकर जमिनीचा वाद होता. कांबळे यांच्याकडे कुळाची जमीन होती. जमीनीच्या वादातुन व मृत कांबळे हे खोटे गुन्हे दाखल करतो म्हणुन त्यांनी संग्राम पाटील याला मयत कांबळेला मारण्यासाठी किंवा अपहरण करण्यासाठी पाच लाख रुपयाची सुपारी दिली होती. संग्राम पाटील व त्याचे मित्र रुतीक पाटील, रोहन पाटील यांनी दि. २० जानेवारी रोजी मयत कांबळे हे कोर्टात कामाकरीता आलेवर त्यांचेवर पाळत ठेवुन होते. कोर्टातुन काम आटोपून पायी चालत जात असताना त्यांना वरील इनोव्हा कारने पाठीमागुन धडक दिली. पण तो अपघात नसून खून झाल्याचे स्पष्ट झाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.