Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जबरी चोरी; इचलकरंजीतील जर्मन टोळीतील 5 जणांना अटक : सांगली एलसीबीची कारवाई

जबरी चोरी; इचलकरंजीतील जर्मन टोळीतील 5 जणांना अटक : सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील हरिपूर येथे नदी काठावर फोटो काढणाऱ्या मुलींना पिस्तुल तसेच शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली. यातील पाचही संशयित इचलकरंजी येथील जर्मन टोळीचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून मोबाईल, दोन दुचाकी, एक छऱ्याची पिस्तुल असा 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

खलील राजू हुंडेकर (वय 20, रा. दर्ग्याजवळ, कबनूर), नौशाद करीम मुजावर (वय 23, रा. इंदिरा कॉलनी, कबनूर), निखील शंकर पाटील (वय 19, रा. पाटील मळा, कबनूर), नईम हसन कोकटनूर (वय 27, रा. जवाहरनगर, इचलकरंजी), आयुब अहमद आत्तार (वय 20, रा. कबनूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरीतील गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश एलसीबीला दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे पथक तयार केले होते.

हरिपूर येथे दि. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास नदी काठावर फोटो काढणाऱ्या मुलींना पिस्तुल, शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले होते. याबाबत दि. 1 जानेवारी रोजी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित जयसिंगपूर जवळील चौंडेश्वरी फाट्यावर असल्याची माहिती सहायक निरीक्षक निशानदार यांना मिळाली.

त्यांच्या पथकाने तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हरिपूर येथील जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच अन्य तीन संशयितांची नावेही सांगितली. पथकाने त्या तिघांना कबनूर, इचलकरंजी येथे छापे टाकून अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, एक छऱ्याचे पिस्तुल जप्त केले. सर्व संशयितांना सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, संदीप नलवडे, चेतन महाजन, दीपक गायकवाड, प्रशांत माळी, मेघराज रुपनर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.