सांगलीत पोलिस दलाला काळिमा फासणारी घटना; हवालदाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मागितली खंडणी
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात पोलिस दलाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका हवालदाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याकडेच खंडणी मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वप्नील विश्वास कोळी (वय 39, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे त्या हवालदाराचे नाव आहे. मध्यरात्री त्याला अटकही करण्यात आली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस दलात तसेच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. संशयित कोळी विश्रामबाग पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. जानेवारी 2022 मध्ये कोळी पीडित मुलगी रहात असलेल्या दसरा चौक परिसरात गेला होता. त्यावेळी त्याने पीडित मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केले. शिवाय ती रेड लाईट एरियात रहात असल्याने येथे रहायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे म्हणत त्याने तिच्याकडे खंडणीची मागणी केली.
ही घटना घडल्यानंतर एका सामाजिक संस्थेने याबाबत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्यावर बरेच दिवस वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीही सुरू होती. चौकशीमध्ये हवालदार कोळी दोषी आढळला. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री त्याच्यावर तो कार्यरत असलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला.
कोळी याच्यावर गुन्हा दाखल होताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार एलसीबीच्या पथकाने कोळी याला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली. दरम्यान या गोष्टीची कोठेही चर्चा होऊ नये यासाठी कोळी याला अटक केल्यानंतर त्याला सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. याबाबत सांगली पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.
दरम्यान हे गंभीर प्रकरण असल्याने याचा तपास सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्याकडे देण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.