Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

थोरात प्रकरणी काँग्रेसने सबुरीने घ्यावे : शिवसेनेचा सल्ला

थोरात प्रकरणी काँग्रेसने सबुरीने घ्यावे : शिवसेनेचा सल्ला



मुंबई : खरा पंचनामा

'पटोले-थोरात वाद चिघळू नये. टपून
बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा. पटोले व थोरात हे शहाणे नेते आहेत. यावर फार काय बोलावे? असं म्हणत शिवसेनेनं दोन्ही नेत्यांना आणि काँग्रेस हायकमांडला सबुरीचा सल्ला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून हा सल्ला देण्यात आला आहे.

काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचा वाद शिगेला पोहोचला आहे. थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून दोन्ही नेत्यांना शिवसेनेनं सल्ला दिला आहे. बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे जुनेजाणते व महत्त्वाचे नेते आहेत. थोरातांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षाच्या उरलेल्या फांद्या हलू लागल्या आहेत. थोरातांच्या संयमाचा बांध फुटल्यामुळे हे घडले काय? याचा विचार आता त्यांच्या हायकमांडने केला पाहिजे. 

थोरात हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचा खांदा एका अपघातामुळे निखळला आहे व हात गळय़ात बांधला आहे. तरी ते एकहाती मैदानात उतरून लढण्याच्या मनःस्थितीत आहेत. याचा अर्थ ते खूप दुखावले आहेत व आरपारच्या लढाईस सिद्ध आहेत, असा सल्ला सेनेनं काँग्रेस हायकमांडला अग्रलेखात दिला आहे. 

तांबे प्रकरणात आपल्याला विश्वासात घेतले नाही व ज्येष्ठता असूनही अपमानित केले, असा संताप थोरातांचा आहे व त्यात तथ्य असू शकते. थोरात यांच्यासारख्या नेत्यांचा सन्मान नाही राखायचा, तर कोणाचा राखायचा? थोरात हे पटोले यांच्या आधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते व महाविकास आघाडीचे सरकार असताना थोरातांची भूमिका समन्वयाचीच होती हे मान्य करावेच लागेल' असंही त्यात स्पष्ट केलं आहे.

पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले हे सत्य मान्य करावेच लागेल' असा थेट आरोपच करण्यात आला आहे. 'पटोले हे मेहनती आहेत व भारतीय जनता पक्षात बंड करून ते काँग्रेस पक्षात आले. ते पक्षवाढीसाठी कष्ट घेतात, पण संकटकाळात ज्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले अशा 'घराण्यां'शी नाहक पंगा घेऊन राज्यात त्यांचा पक्ष कसा वाढणार? पटोले यांनीवाद न वाढवता पक्ष पुढे नेला तर 2024 साली महाविकास आघाडीस नक्कीच फायदा होईल.

नाहीतर 2024 आधी कमळाबाईवरील भुंगे काँग्रेसच्या उरलेल्या मधाच्या पोळय़ावर बसतील. सत्यजीत तांबे यांच्यावर आमचे लक्ष आहे, असे एक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेच आहे. भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ते घडविण्यासाठी रामभाऊ म्हाळगी संस्थेची स्थापना केली, पण भाजप इतरांनी घडवलेले व बनवलेले कार्यकर्ते उचलूनच स्वतःच्या इमारतीचे इमले रचत आहे' असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला. नगर जिल्हय़ात त्यांनी आधी विखे-पाटलांना 'मेकअप' करून भाजपमध्ये आणले व आता त्यांचा सत्यजीत तांबेंवर डोळा आहे.

त्यात बाळासाहेब थोरातांसारख्या नेत्याने बंडाचे दंड थोपटल्याने भाजपच्या मनी उकळ्याच फुटल्या असतील. म्हणून थोरातप्रकरणी काँग्रेसने सावध राहायला हवे, असेही म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.