दुचाकीवरील सह प्रवाशाची मद्यपान चाचणी बेकायदा
मुंबई : खरा पंचनामा
मद्यपान केले की नाही याची तपासणी करण्याची बळजबरी केली जाऊ शकत नाही. किंबहुना दुचाकीचालकाने मद्यपान केले नसल्याचे या तपासणीतून स्पष्ट झाल्यास मागे बसलेल्याची तपासणी करणे बेकायदा ठरते, अशी टिप्पणी सत्र न्यायालयाने केली आहे.
तसेच मद्यपान केले की नाही याची तपासणी करण्याचा आग्रह करणाऱया वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका केली.
दुचाकी चालवणारा मद्याच्या अंमलाखाली नसल्याचे निष्पन्न झाले असताना आरोपीला मद्यपान केले की नाही याची तपासणी करण्यास सांगण्याची आवश्यकता नव्हती, असे असतानाही तक्रारदार वाहतूक पोलिसाने आरोपी मद्याच्या नशेत असल्याचे दाखवण्यासाठी त्याला ब्रेथ अॅनालायझर तपासणी करण्यास सांगितले. परंतु त्याची ही कृती बेकायदा आणि वाहतूक नियमांविरोधात असल्याचे न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका करताना नमूद केले.
भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ नुसार, सरकारी सेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हेतुत: त्याच्यावर हल्ला करणे हा गुन्हा आहे. या प्रकरणातही आरोपीने तक्रारदार पोलिसाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. मात्र आरोपीने मद्यपान केल्याचा कोणताही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. त्यानंतरही त्याने मद्यपान केले की नाही याची तपासणी करणे बेकायदा आहे. तसेच आरोपीने तक्रारदार त्याचे कर्तव्य बजावताना त्याच्यावर हल्ला केल्याचे म्हणता येणार नसल्याचेही न्यायालयाने म्हटले.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी प्रभाकर सोमवंशी आणि त्याचा भाऊ यांना २४ फेब्रुवारी २०१३ रोजी मध्यरात्रीनंतर शीव-तुर्भे मार्गावरील नाकाबंदीदरम्यान थांबवण्यात आले. पोलीस तानाजी मांढरे यांनी दुचाकीस्वाराकडे परवान्याची मागणी केली. मात्र तो ते सादर करू शकला नाही. आरोपी आणि दुचाकीस्वार दोघांनीही मद्यपान केले असल्याच्या संशय आल्याने मांढरे यांनी दुचाकीस्वाराची ब्रेथ ऍनालायझर माध्यमातून तपासणी केली. त्यानंतर मांढरे यांनी आरोपीलाही ही तपासणी करण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिला. तसेच मांढरे यांना अपशब्द वापरले. त्यानंतर आरोपीने मांढरे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.
दुसरीकडे पोलिसांनी आपल्याला या प्रकरणी गोवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आरोपीने केला होता.
न्यायालयाने आरोपीचे म्हणणे योग्य ठरवले. तसेच त्याने मद्यपान केल्याचे दाखवणारा एकही पुरावा पोलिसांनी सादर केलेला नाही. आरोपीने तक्रारदाराशी गैरवर्तन केल्याचे पुरावेही सादर केलेले नाहीत, असेही न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका करताना नमूद केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.