राष्ट्रवादीच्या फुटीचा मुहूर्त ठरला?
ठाणे : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ठाण्यातील नगरसेवकांची काही दिवसांपूर्वी तातडीची बैठक बोलावली. नगरसेवक फुटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना 1 ते 2 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान ठाण्यातील राष्ट्रवादीच्या फुटीचा मुहूर्त ठरल्याची चर्चा रंगली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या या आरोपानंतर अजित पवार यांनी या नगरसेवकांची बैठक बोलावली होती. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश करण्यासाठी 1 ते 2 कोटींची ऑफर दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्याने घेत अजित पवार यांनी सर्व नगरसेवकांची एक बैठक घेतली. नगरसेवक फुटू नयेत किंवा ऑफरमुळे राष्ट्रवादीत फुट पडू नये यासाठी अजित पवार यांनी धावाधाव सुरु केली आहे.
गेले अनेक दिवस ठाण्यात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या फुटीच्या चर्चेला आता मूर्त स्वरूप देण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी १२ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरवण्यात आला असून या दिवशी मुंब्य्रातील काही माजी नगरसेवकांसह ठाण्यातील ज्येष्ठ माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यात पुन्हा एकदा राजकीय धमाका होण्याची शक्यता आहे.
आव्हाड यांचे ट्विटर बॉम्ब, त्यानंतर कळवा परिसरात रंगलेले बॅनर युद्ध, या सर्व घडामोडींआधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवकांचे बाळासाहेबांची शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत मिळू लागले होते. त्यातच शनिवारी पालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर बसून १२ फेब्रुवारीला बारा वाजवणार, असा केलेला दावा आणि सायंकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला नजीब मुल्लांसह राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी लावलेली हजेरी, त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी 'तेरे मेरे सपने अब एक रंग है' म्हणत केलेले ट्विट यावरून ठाण्यात राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या काळात राष्ट्रवादीचे १२ ते १५ माजी नगरसेवक पक्षाला रामराम करणार असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.