जीएसटी कर अधिकारी महिलेस लाच घेताना पकडले
सांगली : खरा पंचनामा
एका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे व्यवसाय कर, परफॉरमन्स बोनस यावरील विलंब शुल्क माफ करण्याकरिता आणि वाढीव रकमेची नोटीस न देण्याकरिता 15 हजाराची लाच स्विकारताना राज्य कर उपायुक्त कार्यालयातील (जीएसटी) व्यवसाय कर अधिकारी महिलेस रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी ही कारवाई केली.
स्वप्नाली सतीश सावंत (वय ३९ रा. गेस्ट हाऊस नजीक, ताकारी, ता. वाळवा ) असे त्या अधिकारी महिलेचे नाव आहे. तक्रारदार महिलेकडे कर अधिकारी स्वप्नाली सावंत हिने विलंब शुल्क माफी आणि वाढीव रकमेची नोटीस न काढण्यासंदर्भात २५ हजाराची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार महिलेने काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी करुन आज दुपारी राज्य कर उपायुक्त कार्यालय, वस्तू व सेवा कर भवन येथे सापळा रचला. तक्रारदार आणि कर अधिकारी सावंत यांच्यात झालेल्या संवादानुसार पंचवीस ऐवजी पंधरा हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार आज कर अधिकारी स्वप्नाली सावंत हिने तक्रारदाराकडून पंधरा हजाराची लाच स्विकारली. त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी सावंत हिला रंगेहात पकडले.
याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.
ही कारवाई पोलिस उपाधीक्षक संदीप पाटील, निरिक्षक विनायक भिलारे, अंमलदार धनंजय खाडे, सीमा माने, प्रितम चौगुले, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, सलीम मकानदार, अजित पाटील, चंद्रकांत जाधव, ऋषिकेश बडणीकर, अतुल मोरे, राधिका माने, विना जाधव, चालक अनिस वंटमोरे यांच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.