तीन हजारांची लाच घेताना आटपाडी 'तहसील'चा सहायक जाळ्यात
सांगली : खरा पंचनामा
फसवणूकीचा गुन्ह्यातून मुक्तता करून गुन्हा निकाली काढण्यात मदत करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना आटपाडी तहसील कार्यालयातील महसूल सहायकास रंगेहात पकडण्यात आले. मंगळवारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
मेहबुब नबिलाल बागवान (वय ४२, रा. दत्तनगर, आटपाडी, मूळ रा. लोहारा बुद्रुक, उस्मानाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याची सुनावणी आटपाडीचे निवासी नायब तहसीलदार यांच्यासमोर सुरू आहे. वरिष्ठांना सांगून गुन्ह्यातून मुक्तता आणि गुन्हा निकाली काढण्यासाठी बागवान याने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार सोमवारी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागास देण्यात आली.
त्यानुसार तातडीने याची पडताळणी करण्यात आली. संशयित बागवान याने पहिल्यांदा पाच हजार आणि तडजोडीनंतर तीन हजारांची लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. दरम्यान, आज दुपारी आटपाडी तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी बागवान याने तीन हजारांची लाच स्विकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बागवान याला लाच घेताना रंगेहात पकडले. त्याच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, सलीम मकानदार, राधिका माने, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चालक अनिस वंटमुरे यांचा कारवाईत सहभाग होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.