Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाचप्रकरणी एक्साईजच्या जवानासह तिघांना अटक

लाचप्रकरणी एक्साईजच्या जवानासह तिघांना अटक



नाशिक : खरा पंचनामा

जिल्ह्यातील निफाड येथील येवला रोडवरील बार चालकाकडून ९ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवानासह दोघा खासगी व्यक्ती अशा तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून, निफाड पोलिसात तिघांविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

लोकेश संजय गायकवाड (३५, रा. नाशिक) या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यासह बारचालकांकडून वसुलीसाठी मध्यस्थी असलेले पंडित रामभाऊ शिंदे (६०), प्रवीण साहेबराव ठोंबरे (४७, दोघे रा. निफाड) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत. हॉटेल व्यवसायिक असलेल्या तक्रारदार यांचे येवला रोडवर तीन बार आणि रेस्टॉरंट आहेत.

बारची तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून केली जात असते. या नियमित तपासणीमध्ये हॉटेल्समधील कामाच्या त्रुटी न काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील जवान लोकेश गायकवाड व वसुलीसाठी मध्यस्थी असलेले दोघे खासगी व्यक्ती संशयित शिंदे व ठोंबरे यांनी एका हॉटेलचे ४ हजार रुपये प्रमाणे गेल्या ३ फेब्रुवारी रोजी मागणी केली होती. तडजोडी अंती तीन हॉटेलचे मिळून ९ हजार रुपये देण्याचे ठरले.

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने पडताळणी केल्यानंतर, सोमवारी रात्री निफाड येथे सापळा रचला. ९ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा जवान गायकवाड, शिंदे व ठोंबरे आले असता, लाचेची रक्कम स्वीकारताना तिघांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी निफाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.