ट्रान्सफॉर्मरमधून साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक, तासगाव पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मालगाव (ता. मिरज) परिसरातील ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून चोरीच्या तारा, दुचाकी, मोबाईल असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेश महादेव मलमे (वय २४), रोहित राजेंद्र चव्हाण (वय २२, रा. रायवाडी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरीतील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तासगावचे पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी एक पथक तयार केले होते. तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर महिला तंत्रनिकेतन समोर दोन तरूण थांबले असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार पथकाने तेथे सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या पोत्यात तांब्याच्या तारा सापडल्या. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी मालगाव येथील ट्रान्सफॉर्मरमधून त्या चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तांब्याच्या तारा, मोबाईल, दुचाकी असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांनाही मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक बजरंग झेंडे, अमित परीट, सोमनाथ गुंडे, समीर आवळे, सतीश खोत, विनोद सकटे, निलेश ढोले, जितेंद्र चव्हाण, महादेव हसबे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.