Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत व्हेल माशाची उलटी जप्त; दोघांना अटक : एलसीबीची कारवाई

सांगलीत व्हेल माशाची उलटी जप्त; दोघांना अटक : एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असलेली आणि कोट्यवधी किमतीने विकल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रिस) तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली. एलसीबीच्या पथकाने सांगली आणि मालवणमधील दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ५ किलो ७१० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी, चारचाकी आणि दुचाकी असा एकूण ५ कोटी ७९ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सलीम गुलाब पटेल (वय ४९ रा. खणभाग, सांगली) आणि अकबर याकूब शेख (वय ५१ रा. पिंगोली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास करून यात असणाऱ्या संशयितांवर लवकरच कारवाई करू, असे महानिरीक्षक फुलारी यावेळी म्हणाले.

सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात अवैध वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कारवाईच्या सक्त सूचना पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक पथक तयार केले होते. ते पथक शहरात गस्त घालत होते. व्हेल माशाची कोट्यवधी रुपयांची उलटीची तस्करी होणार असून सदरचा अंबरग्रिस विक्रीसाठी शामरावनगरमध्ये दोघेजण थांबले आहेत, अशी गोपनीय माहिती सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली. 

त्यानुसार एलसीबी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावला. यावेळी कारमधून एकजण बॉक्स घेऊन उतरताना दिसला. यावेळी संशय आल्याने सलीम पटेल आणि अकबर शेख या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी अकबर शेख याच्या जवळ बॉक्समध्ये व्हेल माशाची उलटी आढळून आली. याबाबत त्याच्याकडे चौकशी करता त्याने सांगितले कि, सदरचा पदार्थ मालवण तालुक्यातील आचरामधून विक्रीसाठी सलीम पटेल याच्या मध्यस्तीने विक्रीसाठी आल्याचे सांगितले. 

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरच्या अंबरग्रिस (उलटी) ची तपासणी करत यावर प्रतिबंध असून त्याची किंमत प्रति किलो एक कोटी रुपये असल्याचे सांगितले. यावेळी त्याच्याकडून ५ कोटी ७५ लाख ५० हजारांची ५ किलो ७१० ग्रॅम वजनाची उलटी, २५ हजारांची दुचाकी आणि ३ लाख ५० हजारांची चारचाकी असा एकूण ५ कोटी ७९ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर, अच्युत सूर्यवंशी, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, संकेत मगदूम, राहुल जाधव, मच्छिंद्र बर्डे, सागर टिंगरे, अजय बेंद्रे, संतोष गळवे, संकेत कानडे यांच्यासह वनविभागाचे वनरक्षक युवराज पाटील, मानद वन्यजीवरक्षक अजितकुमारप पाटील, तुषार कोरे, सागर थोरवत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.