गुन्हेगाराला पकडताना गोळी सुटली अन पोलिस अधिकारी झाला जखमी!
हिंगोली : खरा पंचनामा
रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेल्यावर झालेल्या झटापटीत बंदुकीतून गोळी सुटली आणि त्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार गुन्हेगार त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. यावेळी त्या गुन्हेगाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला पकडताना झालेल्या झटापटीत चुकून एका पोलीस अधिकाऱ्याच्या ताब्यातील बंदुकीतून गोळी सुटली. त्यात दुसरा पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला.
कळमनुरी शहरातील इंदिरा नगर परिसरात 2021 मध्ये घडलेल्या एका गुन्ह्यात पोलिसांनी नऊ ते दहा जणांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर अटकेची कारवाई टाळण्यासाठी बबलुसिंग हत्यारसिंग टाक याने पळ काढला होता. तेव्हापासून मागील वर्षभर तो फरार होता. तो त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घराभोवती घेराव घातला आणि त्याला पकडण्यासाठी काही अधिकारी आज दुपारी त्याच्या घरात शिरले होते. यावेळी टाकने पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि टाकमध्ये झटापट झाली. त्यात पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या ताब्यातील बंदुकीतून चुकून गोळी सुटली आणि ती गोळी पोलीस उपनिरीक्षक शेख माजीद यांना लागली.
माजीद यांना गंभीर दुखापत झाली असून, कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान अधिकारी जखमी होऊनही पोलिसांनी टाक याला पकडण्यात यश मिळवले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.