नवीन पायंडे पाडू नका : अजित पवार
पुणे : खरा पंचनामा
पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये असे सांगत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या बक्षीसाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. एखादा गुंड सापडतच नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. सरसकट बक्षीस जाहीर करणे हे पोलिस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे असे अजित पवार म्हणाले.
वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते, तेव्हा अशा प्रकारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र, सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. गुन्हेगाराला पकडणाऱ्या पोलिसांना बक्षीस देण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला होता. फरार असणाऱ्या, पाहिजे असणाऱ्या, शस्त्र बाळगणाऱ्या आणि सराईत गुंडांना पकडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाच ते दहा हजार रुपये बक्षीस देण्याचे पुणे पोलिसांनी जाहीर केले होते. या निर्णयावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एखादा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती सापडतच नसेल तेव्हा त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर होत असेल तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. कायदा सुव्यवस्था राखणे आणि महिलांवर अत्याचार न होऊ देणे हे पोलिस यंत्रणेचे काम आहे. मात्र, या कामासाठी त्यांना आमिष दाखवले जात असेल तर हे योग्य नाही, असेही पवार यांनी सांगितले.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून, खबऱ्याच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. नवीन पायंडे पाडण्याची गरज नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी बक्षीस देण्याचा निर्णय का घेतला त्याची मी त्यांना विचारणा करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.