Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निगडीतील खुनासह दरोडाप्रकरणी तिघांना अटक : सांगली एलसीबीची कारवाई

निगडीतील खुनासह दरोडाप्रकरणी तिघांना अटक : सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

शिराळा तालुक्यातील निगडी येथील एका वस्तीवर दरोडा टाकून एका वृद्धेचा खून करून दागिने लंपास करण्यात आले होते. दि. १७ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी सांगली एलसीबीच्या पथकाने तिघा दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून एक दुचाकी, चोरीचे दागिने, रोकड असा पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.   

मगऱ्या अशोक उर्फ अजितबाबा काळे (वय १९, रा. येवलेवाडी. ता. वाळवा, जि. सांगली), लक्षद उर्फ स्वप्नील पप्या काळे (वय २६, रा. कार्वे, ता. वाळवा, जि. सांगली), गोपी उर्फ टावटाव त्रिशूल उर्फ तिरश्या काळे (वय १९, रा. ऐतवडे खुर्द ता. वाळवा, जि. सांगली) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. दि. १७ जानेवारी रोजी संशयितांनी निगडी येथील शेतातील वस्तीवर सदाशिव दादू साळुंखे यांच्या घऱाचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.  

त्यावेळी संशय़ितांनी झोपेत असलेल्या हिराबाई सदाशिव साळुंखे यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्यावेळी संशयितांनी साळुंखे दाम्पत्यावर शस्त्राने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. यातील हिराबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांना तातडीने या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक पथक तयार केले. 

एलसीबीचे पथक याचा तपास करत असताना मगऱ्या काळे याने हा दरोडा टाकल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. तसेच तो साथीदारांसोबत इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाटा परिसरात थांबल्याची माहितीही मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ६० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, दहा हजारांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. यातील मगऱ्या काळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात कासेगाव, आष्टा, इस्लामपूर पोलिस ठाण्यात घरफोडी, जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान निगडीतील दरोड्यातील आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

पोलिस अधीक्षक डॉ. तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, शिराळ्याचे निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, जितेंद्र जाधव, उदय माळी, सागर टिंगरे, संकेत कानडे, संतोष गळवे, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.