सांगलीच्या तरुणाचा सावंतवाडीच्या जंगलात गूढ मृत्यू
सांगली : खरा पंचनामा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील शिरशिंगे जंगलात सांगलीच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सावंतवाडी येथे कामासाठी गेलेल्या तरुणाचा जंगलात मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान चार दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडल्याने नातेवाईकांकडून त्याच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
राहुल संजय झेंडे (वय 22, रा. वडर कॉलनी, सांगली) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गवंडी काम करणारा कृष्णा विठ्ठल शिंदे (वय 48, मूळ रा. उत्तर शिवाजीनगर, सांगली, सध्या रा. शिवापूर, गडकरिवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांनी वर्दी दिली आहे. मृत राहुल त्याच्या मित्रांसोबत कामासाठी सावंतवाडी येथे गेला होता. गवंडी काम करणारा शिंदे याच्याकडे तो काम करत होता असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दि. 28 जानेवारीच्या सकाळी सातपासून तो बेपत्ता झाला होता. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शिरशिंगे येथील जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याला दारू आणि गांजाचे व्यसन होते. ते न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची नोंद सावंतवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दरम्यान शिरशिंगे जंगलात त्याचा अर्धनग्न मृतदेह मिळाला असून तो अर्धवट जळाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ वाढल्याचे चित्र आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.