Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

122 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती : संयोगीताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार!

122 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती : संयोगीताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार!



नाशिक : खरा पंचनामा

तब्बल 122 वर्षानंतर पुन्हा एकदा वेदोक्त प्रकरण चर्चेत आलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला होता. त्याविरोधात शाहू महाराज यांनी मोठा लढाही दिला. माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आलं आहे. 

नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिरात हा प्रकार घडला आहे. स्वत: संयोगिताराजे यांनीच हा प्रकार आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून सांगितला आहे. शंभर वर्षापूर्वी जे शाहू महाराजांबाबत घडलं तेच संयोगिताराजेंबाबत घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

मागील महिन्यात संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस झाला. त्यावेळी ते नाशिकमध्ये होते. त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती या सुद्धा नाशिकमध्येच होत्या. त्यामुळे संयोगिताराजे या संभाजी छत्रपती यांच्यासोबत काळाराम मंदिरात गेले होते. मंदिरात दर्शन घेत असताना त्यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंताने मज्जाव केला. त्यामुळे त्या संतापल्या. त्यांनी या महंताला सुनावले. झाला प्रकार त्यांनी आपल्या पोस्टमध्ये कथन केला आहे.

संयोगीता राजे यांनी केलेली पोस्ट अशी,
हे श्रीरामा,
स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणाऱ्या, परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना सद्बुद्धि दे... हीच आमची प्रार्थना, अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आपण सर्वजण देवाची लेकरे.. आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते.

त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.

नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की, ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका.

तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच... तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.

या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे. अजूनही खूप प्रवास बाकी आहे... अजून खूप चालावे लागणार आहे. हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.