Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजप आमदाराला 19 वर्षांपूर्वी मारहाण : विधानसभेत हक्कभंग, 6 पोलिसांना शिक्षा

भाजप आमदाराला 19 वर्षांपूर्वी मारहाण : विधानसभेत हक्कभंग, 6 पोलिसांना शिक्षा



लखनौ : खरा पंचनामा

उत्तर प्रदेशच्या विधानसभेने शुक्रवारी  काही वेळासाठी न्यायालयाचं रूप धारण केलं होतं. 19 वर्षांपूर्वी भाजप आमदाराला मारहाण करणाऱ्या पोलिसांना उत्तर प्रदेश विधानसभेनं एका दिवसाची कोठडी सुनावलीय. विधानसभेनं अशा प्रकारची शिक्षा सुनावल्यानं या घटनेची सर्वत्र चर्चा होतेय.

दोषी पोलिसांना विधानसभा सभागृहात बोलावण्यात आलं आणि न्यायालयात ज्याप्रकारे आरोपींना पिंजऱ्यात उभं केलं जातं, तसं या पोलिसांना उभं करण्यात आलं होतं. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांना शिक्षा सुनावली.

2004 साली उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्षाचं सरकार होतं. त्यावेळी वीज कपात करण्यात आली होती. त्याविरोधात भाजपचे तत्कालीन आमदार आणि सध्या उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष असलेले सतीश महाना हे धरणं आंदोलनाला बसले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील भाजपचे सर्व आमदार सतीश महाना यांच्या समर्थनासाठी दाखल होत असताना, पोलिसांनी लाठीमार सुरू केला होता. भाजपचे कानपूरचे तत्कालीन आमदार सलील विश्नोईना केलेल्या मारहाणीत त्यांचा पाय तुटला होता. विश्नोईना गंभीर दुखापत झाल्यानं ते बरेच दिवस अंथरुणाला खिळले होते.

विश्नोईनी 25 ऑक्टोबर 2004 रोजी विधिमंडळ सदस्यांच्या विशेषाधिकारांचं उल्लंघन आणि विधिमंडळाचा अपमान या प्रकरणी विशेषाधिकार समितीकडे तक्रार केली होती. उत्तर प्रदेशच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. यादरम्यानच 27 फेब्रुवारी 2023 रोजी सलील विश्नोई मारहाण प्रकरणातील आरोपी पोलिसांना हजर राहण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी दिले.

विशेषाधिकार समितीने मारहाण करणाऱ्या पोलिसांना दोषी ठरवलं होतं आणि कठोर शिक्षेची शिफारस केली होती. दोषी पोलिसांना विधानसभेच्या परिसरातीलच एका सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. तत्कालीन विभागीय अधिकारी अब्दुल समद, तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी ऋषिकांत शुक्ला, तत्कालीन उपनिरीक्षक त्रिलोकी सिंह, तत्कालीन कॉन्स्टेबल छोटेलाल यादव, विनोद मिश्र आणि मेहरबान सिंह यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

बसपा, अपना दल, निषाद पार्टी, काँग्रेस, जनसत्ता दलासह सर्वपक्षीयांनी या शिक्षेशी सहमत होत, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.