सांगली सिव्हीलमध्ये रूग्णांच्या आरोग्याशी खेळ!
स्वच्छतेसाठी निधीच नसल्याने ठेकेदाराने काम थांबवले
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील शासकीय रूग्णालय अथार्तच सिव्हील हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर ड्रेनेज तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दरम्यान सिव्हील प्रशासनाकडे निधी नसल्याने ठेकेदाराने काम थांबवल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण महाराष्ट्रासह कर्नाटकातील गोरगरीब रूग्णांचा आधार म्हणून सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलची ओळख आहे. या हॉस्पिटलमध्ये दररोज सुमारे एक हजार ते दीड हजार रूग्ण बाह्यतपासणी विभागात उपचारासाठी येत असतात. शिवाय अडीचशे ते तीनशे रूग्ण उपचारासाठी आंतररूग्ण विभागात दाखल आहेत. या रूग्णांना हॉस्पिटल परिसरातील घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे.
हॉस्पिटल परिसरातील ड्रेनेजची झाकणे नसून ड्रेनेजचे पाणी सर्वत्र पसरले आहे. शिवाय विविध प्रकारचा वैद्यकीय कचऱ्याचे ढीगही लागले आहेत. घाणीच्या या साम्राज्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. डुकरांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधील रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रूग्णालयाचे अधिष्ठाता आजारी असल्याने रजेवर आहेत. सध्या त्याचा प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे सिव्हीलमधील सारीच यंत्रणा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. रूग्णांच्या समस्यांकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.