जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक : सांगलीच्या दोघांवर पुण्यात गुन्हा
पुणे : खरा पंचनामा
गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 2 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक केल्यानंतर संचालक कार्यालय बंद करुन दुबईला पळून गेले. याप्रकरणी सांगलीतील दोघांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रांत पाटील (वय 25, रा. मोराळे, ता. पलूस), संतोषकुमार गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवणे येथील एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार प्रभात 20 ते 27 ऑगस्ट 2021 दरम्यान घडला होता. फिर्यादी यांच्या पतीची व्यावसायिक स्थिती चांगली असल्याचे पाहून संतोषकुमार गायकवाड याने त्यांच्याशी मैत्री केली. आपला फॉरेक्स, ट्रेडिंग व क्रिप्टो करन्सीचा व्यवसाय असून बेस्ट पॉईट इम्पॅक्ट जनरल ट्रेडिंग नावाने कंपनी असल्याचे सांगितले. कंपनीचे प्रभात रोडवर कार्यालय असल्याचे सांगितले. त्याच्या आग्रहामुळे तसेच इतर लोकांना दरमहा 5 ते 6 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाल्याचे त्याने दाखविले.
त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे सुरुवातीला 1 कोटी रुपयांची गुंतवणुक केली. त्यानंतर 24 ऑगस्ट 2021 ला 80 लाख रुपये रोख दिले. संतोषकुमार गायकवाड याने समजुतीचा करारनामा करुन दिला. मार्च 2022 मध्ये तुम्हाला देण्यात येणाऱ्या नफ्याच्या रक्कमेचा आपण संपूर्ण हिशेब करुन ती 6 टक्के दराने येणारी रक्कम तुम्हाला देण्यात येईल. तुम्ही आणखी दुसरी गुंतवणूक सुरु करा म्हणजे मार्च महिन्यात तुमचा आणखी फायदा होईल, असे सांगितले. त्यानंतर तो दुबईला गेला. मार्च 2022 च्या पहिल्या आठवड्यात संतोषकुमार गायकवाड पुण्यात आला.
त्याने फिर्यादी यांच्या परताव्याच्या रक्कमेचा हिशेब करुन तुम्हाला अंदाजे 50 लाख रुपये मिळणार असे सांगितले. त्यानंतर आणखी 20 लाख रुपये द्या म्हणजे तुमची गुंतवणुक अडीच कोटी रुपये होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी आणखी 20 लाख रुपये रोख प्रभात रोडच्या कार्यालयात नेऊन दिले. त्यानंतर तो अचानक दुबईला निघून गेला.
फिर्यादीच्या पतीने अनेकदा फोन केले. तेव्हा त्याने आज देतो, उद्या देतो, असे सांगून टाळाटाळ केली. प्रभात रोडवरील कार्यालय सुद्धा बंद केले. पुण्यात परत आलो की पैसे देतो, असे सांगून त्यांना झुलवत राहिला. नंतर त्यांचे फोनही घेणे बंद केले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.